हार्दिक पटेलही काँग्रेसच्या गळाला, लवकरच होणार मोठी घोषणा

हार्दिक पटेलही काँग्रेसच्या गळाला, लवकरच होणार मोठी घोषणा | Hardik-Patel-Congress

अहमदाबाद

पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्याचे कळते आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघांतून ते निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. कारण या ठिकाणी पाटीदार, पटेल समाज बहुसंख्य आहे. या बाबतची अधिकृत घोषणा 12 मार्च रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर किंवा राहुल गांधी यांच्या सभेदरम्यान होण्याची शक्यता आहे.

हार्दिक पटेल लोकसभा लढविणार!

हार्दिक पटेल हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हार्दिक पटेल यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली असून याच महिन्यात पक्षप्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. गुजरातमधील दलित समाजाचे नेत जिग्नेश मेवाणी, तसेच ठाकोर समाजेचे नेत अल्पेश ठाकोर हे 2017 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यावेळी हार्दिक पटेल देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र निवडणुकीसाठी त्यांचे 25 वर्ष वय पूर्ण झाले नव्हते. मात्र जुलै 1018 मध्ये हार्दिक यांनी वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत.

काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीने हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल दुजोरा दिला असून लवकरच याबाबत मोठी घोषणा होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जामनगर लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. जामनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे आजी खासदार पुनम मदाम आणि काँगेसचे उमेदवार विक्रम मदाम यांच्यात चुरशीची लढत झाली होती. मात्र पुनम मदाम यांनी त्यांचे काका विक्रम मदाम यांना थोड्या फरकाने पराभूत केले. विक्रम मदाम यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने हार्दिक पटेल यांचा रस्ता मोकळा झाला आहे. तसेच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पटेल समाज असून दलित आणि मुस्लीम मतांच्या जोरावर हार्दिक पटेल यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी हार्दिक पटेल यांचे पक्षात स्वागत असल्याचे सांगून ‘ते निवडणूक देखील लढवू शकतात. तसेच ते एक चांगले नेते असून त्यांना तरुण आणि शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा आहे’, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here