Skip to content Skip to footer

लोकसभेसाठी भाजपकडून आ. मोनिका राजळे निवडणूक रिंगणात

पाथर्डी – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार मोनिका राजळे यांना लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ गोटात याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची विश्‍वसनीय माहिती समजते.

कॉंग्रेस आघाडीकडून अनुराधा नागवडे किंवा डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून उमेदवारी बदलाच्या हालचालीचे संकेत मिळत आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या तगड्या उमेदवाराला भाजपकडून आ. राजळे यांची लोकप्रियता मात देऊ शकते हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून भाजप नेत्यांकडून ही व्युव्हरचना आखली जात आहे. पाथर्डी -शेवगाव मतदार संघात अजानशत्रू नेतृत्व म्हणून आ. राजळे यांच्याकडे पाहिले जाते. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून विकास कामाच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत होम ग्राऊंडवरून त्यांना मोठे पाठबळ मिळेल. मितभाषी व अभ्यासू असलेल्या राजळे यांनी विश्वासू आमदार म्हणून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ओळख निर्माण केली आहे.

स्वर्गीय राजीव राजळे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन दोन वेळा निवडणूक लढवली होती. 2009 साली अपक्ष निवडणूक लढवत एकाकी परंतु अत्यंत कडवी झुंज देवून स्वबळावर सुमारे दीड लाख मते घेतली. 2014 सालीच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांना सुमारे चार लाख मते मिळाली. मोदी लाटमुळे या निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण लोकसभा मतदार संघात वैयक्तिक कार्यकर्त्यांचे सर्वाधिक मोठे जाळे निर्माण करणारे राजीव राजळे आजही आघाडीवर आहेत. आजही त्यांना मानणारे कार्यकर्ते राजळे कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत.

स्व. राजळेंच्या निधनानंतर त्यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले. ते शल्य त्यांच्या चाहत्यांच्या मनाला बोचत आहे. स्व. राजळे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना या मतदारसंघात आहे. स्व. राजळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघातील जनता पक्ष बाजूला ठेवून आ. राजळे यांच्या मागे उभे राहील, अशी परिस्थिती आहे.जिल्ह्यातील नात्यागोत्याचे राजकारणही त्यांना पोषक राहील. बहुसंख्येने ओबीसी मतदार असलेल्या या मतदारसंघावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव आहे. या सर्व राजकीय समीकरणाच्या आधारे आ. राजळेंना लोकसभेच्या उमेदवारीची गळ भाजप वरिष्ठ नेत्यांनी घातल्याचे समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या समवेत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आ.राजळे यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी आ. राजळे यांनी या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिल्याची माहिती आहे. मात्र पक्षहितासाठी शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राजळे यांना लोकसभा लढवण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी सोपवण्याची खात्रीलायक वृत्त आहे.

Leave a comment

0.0/5