Skip to content Skip to footer

Loksabha 2019: युती झाल्यावर काही नेत्यांनी माघार घेतली- फडणवीस

अमरावती- युती झाल्यावर काही नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. तसेच, ही युती म्हणजे मजबूत जोड आहे कोणीही तोडण्याचा प्रयत्न केल्याने ती तुटणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अमरावती येथे चालू असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

ही युती सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी झालेली आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. आमचं हिंदुत्व राष्ट्रसाठी, ज्याला देशावर प्रेम आहे, ते आमचं हिंदुत्व आहे असेही ते पुढे म्हणाले.

भविष्यात आमची युती युती अशीच मजबूतपणे टिकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती हा आपला एकच धर्म असून जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचं नाही असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना बजावून सांगितले.

Leave a comment

0.0/5