राजकीय घराणेशाही मतदारांच्या मुंडीवर बसल्याशिवाय राहणार नाही

बिझनेस | Political-dynastic-voters

मयुरी विजया रामदास वाशिंबे : निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून मतदानाची ‘मंगल घटिका’ काही दिवसांवर येऊन ठेपलीये. राजकीय घडामोडींना वेग आला असून, राजकीय मैदानात उतरण्यासाठी अनेकांनी कंबर कसलीये. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये घराण्यांचं वर्चस्व झालं अगदी त्याचप्रकारे राजकारणात घराणेशाही होत आहे, एव्हाना झालीये.

आपल्या मुलांना राजकीय बिझनेसमध्ये उतरवण्यासाठी त्यांच्या बापांची पळापळ चालू आहे. विखे पाटलांचा सुजय, पवारांचा पार्थ. उध्दवांचा आदित्य काय तर राज ठाकरेंचा अमित ह्या सर्व बापांची आपल्या मुलांचं राजकरणात बस्तान बसवण्याकरिता घालमेल सुरू आहे. नव्या नेतृत्वास येथे वाव राहिला नसून जर कोणी आलाच तर त्याचा विकास तितकासा होत नाही. जर हिमंतीने त्याने आपले साम्राज्य उभारलं तर पुढे त्यांच्या खानदानाची नवी सुभेदारी सुरू होते.

राजकारणात काही काळापुर्वी विचारधारा, तत्वे आणि समाजकारण या गोष्टी काही प्रमाणात मानल्या जात होत्या. नव्या भारताचे स्वप्न घेऊन राजकारणात प्रवेश केला जायचा. मात्र, आता राजकारणात येणे म्हणजे समाजसेवा किंवा लोकांच्या भल्यासाठी नेतृत्व करणे या गोष्टी राहिल्या नसून एक उत्तम करियर म्हणून राजकारणात प्रवेश केला जात आहे.

राजकीय घराण्यांतील पीढी ‘आयत्या पिठावर रांगोळ्या ओढण्याचे काम करत आहे. यांच्याकडे विचारधारा नाही की तत्वे नाहीत. ध्येय आहे ते फक्त उत्तम राजकीय करीयरचं. ते कितीप्रकारे उपयुक्त असतं ते सांगायला नको. बरं या नव्या पिढीनेही राजकारण करावं. मात्र, काही विचारधारा आणि तत्वे ठेऊन करावं कारण हेच हिताचं आहे. घराण्याच्या जोरावर उड्या मारणाऱ्या पिढीसमोर समाजासाठी कोणतं स्वप्न आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे.

लोकशाही मूल्ये, संस्थाकरण, आदर्शवाद, विचारधारेशी बांधिलकी आणि आदर्शवादाची राजकारणातून हकालपट्टी होत आहे. घराणेबाज राजकीय पक्ष ही लोकशाहीची निव्वळ थट्टा आहे. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल आणि उमर खालीद हे तरूण चेहरे समाजाविषयी नवीन स्वप्ने घेऊन राजकारणात उतरत आहेत. याचप्रकारे महाराष्ट्रातूनही काही नवीन चेहरे शासन-प्रशासनाची धुरा वाहण्यासाठी लायक आणि सक्षम नेतृत्व सत्तास्थानी यायला हवे. लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या या हक्काद्वारे मतदारांनी घराणेशाहीला आणि वारसदारांना दणका द्यायला हवा. नाहीतर ही राजकीय घराणेशाही मतदारांच्या मुंडीवर बसल्याशिवाय राहणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here