मनोहर पर्रीकर राफेलचा पहिला बळी असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवरून पोस्ट केले होते. आज देशभरातून गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणारे मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा बोलताना, माझ्या अंदाजे हा राफेलचा पहिला बळी गेला असे वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. आव्हाड यांच्या तिखट बोलण्याने अनेकवेळा स्वतःला आणि पक्षाला अडचणीत आणले आहे.
आज राजकारण कोणत्या विषयावर करायचे असते याचे भान सुद्धा आमदार जितेंद्र आव्हाड यांना राहिलेले दिसत नाही. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कर्करागाच्या आजाराने पीडित होते. गेल्या वर्षभरापासून पर्रीकर यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबई, नवी दिल्ली, न्यू यॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र या काळातही ते काम करत होते. त्यानंतर तीनच दिवसानंतर ३० जानेवारीला त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्प सादर केला. नाकात नळ्या असतानाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडली होती. आज अनेक पदे भूषवलेले असताना सुद्धा स्वतःच्या मुलांना राजकारण पासून लांब ठेवलेले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून मनोहर पर्रीकर यांच्याकडे पहिले जाते.
आव्हाड साहेब आज इतरांचे घोटाळे बाहेर काढताना आपल्या पक्षातील नेत्यांच्या घोटाळ्यावर चुकार शब्द सुद्धा बोलत नाहीत. आज मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सुद्धा आपण राजकारण केले या बद्दल आपल्या बुद्धीची क्षमता जनतेला दिसून आलेली आहे. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेले व्यक्तीमत्व मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यू नंतर सुद्धा आपण राजकारण करत आहे ही शरमेची बाब आहे आणि आपल्या सारख्या व्यक्तीला जनता कशी काय निवडून देते या गोष्टीचा जनतेने एकदा विचार केला पाहिजे.