Skip to content Skip to footer

लांडे,बांदलांचा भरोसा काय राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडलंय कोडं

पुणे, ता. 20 (प्रतिनिधी)- मोठी मनधरणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक माजी आमदार विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांना शरद पवार यांच्या सभेतील व्यासपीठावर आणले, तरी या दोघांची राजकीय वाटचाल बघता त्यांचा भरोसा काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिरूर विधानसभेचा ‘शब्द’ आपल्याला देण्यात आला आहे, असे बांदल सांगत असल्याने या स्पर्धेत अशोक पवार आणि प्रदीप कंद यांच्याबरोबर बांदल या तिसऱ्या ‘भिडू’ची भर पडली आहे.

लांडे आणि बांदल यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावलण्यात आली. गेली दोन-अडीच महिने दोघांनी भरपूर खर्च करून निवडणुकीतील तयारीची राळ उडवून दिली होती. मात्र पक्षाचे नेते अजित पवार यांनी त्यांचा पत्ता कट करताना भर सभांमध्ये हात वर करून कौल घेताना या दोघांसाठी ‘शुन्य’ हात वर झाले. घनघोर अपमान झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाडणार असे फलक झळकले. त्यामुळेेेे शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचेेेे वातावरण गढूळ झाले ते निवळण्यासाठी नाराज लांंडे, बांदल यांना भोसे येथील सभेत पाचारण करण्यात आले होते. पक्षांतर्गत गट आणि संघर्ष लक्षात घेता या दोघांचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी ठरणार आहे. हात वर करून करण्यात आलेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागल्याने शरीराने हे दोन नेते सभेला उपस्थित राहिले तरी मनात घर करून राहिलेली बोच त्यांना सलत आहे .असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्यावर भरोसा ठेवण्यास तयार नाहीत . त्यांच्या राजकीय फंदफितुरीचा उद्धार होत आहे.

सभेतील सोपास्कार उरकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनीच या दोघांची राजकीय फंदफितुरी काढायला सुरुवात केली आहे. पक्षातील एक बडे नेते म्हणाले, विलास लांडे हे कुठे पक्षाची निष्ठावंत होते? आज उमेदवारी मागतायत, दहा वर्षे कुठे गायब होते? अपक्ष आमदार असताना विधानसभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व घेतले होते. मात्र म्हाडाला जमीन विकण्याच्या एका प्रकरणात लांडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सलगी करून काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व असल्याचे पत्र त्यांना दिले होते. विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली असता लांडे यांना काँग्रेस पक्षाकडून बैठकीचा व्हीप बजावण्यात आला. ते काँग्रेसला जाऊन मिळाले होते. लांडे यांचे म्हाडातील ते काम झाले नाही .म्हणून ते पुन्हा राष्ट्रवादीचे सहयोगी राहिले. असा दाखला या नेत्याने दिला. त्यामुळे लांडे अमोल कोल्हे यांचे काम करतील याचा भरोसा वाटत नाही असेही ते म्हणाले.

 

मंगलदास बांदल यांची राजकीय कारकीर्द बेभरवशाची आणि अविश्वासार्हतेची आहे . किती पक्ष झाले, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप ,त्यानंतर अपक्ष ,महाआघाडी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसे, वंचित आघाडी असा सगळा प्रवास करून थकल्यावर ते याचा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आले. कुठेच डाळ शिजली नाही, की मग ते राष्ट्रवादी असल्याचे सांगतात. बांदल यांची राजकीय विश्वासार्हता काय? सकाळी एक पक्ष, दुपारी दुसऱ्याकडे आणि रात्री तिसर्‍याकडे अशी वाटचाल असणार्‍या बांदल यांचा आम्हाला काय फायदा होणार, त्यापेक्षा तोटाच अधिक होणार आहे. असे सांगून हे नेते म्हणाले,शिरूर तालुक्यामध्ये अगोदरच अशोक पवार आणि प्रदीप कंद यांचे दोन गट आहेत त्यात आता बांदल यांच्या तिसऱ्या गटाची भर पडेल. जिल्हा परिषद बांधकाम सभापती असताना त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. पक्षनिष्ठा आणि बांदल यांचा संबंध काय? असा सवाल या नेत्यांनी उपस्थित करून लांडे, बांदल राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर असले तरी त्यांची निष्ठा भिरभिरती आहे. असा टोला या नेत्याने लगावला. शिरूर विधानसभेसाठी मला नेत्यांनी ‘शब्द’ दिला असे बांधल छातीठोकपणे सांगत आहेत . आतापर्यंत दोघे पायात पाय घालत होते. आता त्यामध्ये तिसऱ्याची भर पडली. बांदल यांचे ‘पैलवान डोकं ‘आम्हाला परवडणारे नाही अशा स्पष्ट शब्दात या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5