आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत एकूण ३६ उमेदवारांचा समावेश आहे. ३६ जागांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचा यात समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत १८४ उमेदवारांचा समावेश होता. तर शुक्रवारी रात्री जाहीर ३६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना देखील स्थान मिळाले आहे. ओदिशामधील पुरी येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.
तर बारामती मतदार संघात भाजपा पक्षाने कांचन कुल यांना उमेदवारी दिलेली आहे. तसेच बारामती मतदार संघातून लढत असलेल्या कांचन कुल यांच्या सुनेत्रा पवार या सख्या आत्या आहेत. सुनेत्रा पवार यांनीच २००५ मध्ये राहुल आणि कांचन यांचे लग्न जमविले होते. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. त्यांचे वडील कुमार राजे निंबाळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत. याच घराण्यातील पदमसिंह पाटील हे दत्तक गेले आहेत. त्यामुळे नात्याने पाटील हेदेखील कांचन कुल यांचे चुलते आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यात होणारी लढत अटी-तटीची असणार आहे.