निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो. या खर्चावर देखरेख ठेवण्याचे काम निवडणूक आयोग करत असते. उमेदवाराने केलेल्या खर्चाचे मोजमाप करण्यासाठी निवडणूक आयोगालाही दरपत्रक तयार करावे लागते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दरपत्रक नुसार निवडणूक आयोगाचा वडापाव १५ रुपये, पोहे ३० रुपये, चहा ८ रुपये, मटण थाळी २५० रुपये, शाकाहारी थाळीसाठी १०० रुपये दर निश्चित केले आहे. त्यामुळे आता उमेदवारांना प्रचारा बरोबर कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाचा सुद्धा हिशेब ठेवावा लागणार आहे.
निवडणूकीत प्रत्येक उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशोब द्यावा लागतो. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदार संघात निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्चित केलेले असते. या दरपत्रका प्रमाणेच उमेदवारांना आपल्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. या दरपत्रकानुसार उमेदवारांच्या खर्चाची नोंद होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या दरपत्रकानुसार वडापाव आणि पॅटीस प्रत्येकी १५ रुपये, पोहे आणि उपमा प्रत्येकी ३० रुपये, चहा साधा ८ तर स्पेशल चहा १५ रुपये, शाकाहारी थाळी १०० रुपये, स्पेशल शाकाहारी थाळी १५० रुपये, अंडाकरी थाळी ९० रुपये, मटण, चिकन, मच्छी थाळी प्रत्येकी २५० रुपये, पाण्याची बाटली १५ रुपये या खाण्यांच्या पदार्थाबरोबर अन्य गोष्टींचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
निवडणुकीत दरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन,भाड्याने वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. स्पीकर प्रतिदिनी ३५४ रुपये, झेंडे ३५ पासून ६० रुपयांपर्यंत, टोपी २५ रुपये, बिल्ले १० रुपये, छायाचित्राची फीत वीस रुपये, अगदी मंडप, खुर्च्या हारतुऱ्यांपासून फटाक्यांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. १००० ची माळ साडेसातशे रुपयांनी खरेदी करावी लागणार आहे. ढोल वादन पथक, पोवाडे, पथनाट्य पथकाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. पोवाडा पथकाला दोन हजार रुपये तर पथनाट्य पथकाला चार हजार रुपये दर मोजवा लागणार आहे.