कोल्हापूर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी हातकणंगले मतदार संघातून लोकसभा निवडणुकीला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या पुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शेट्टी हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील झालेले होते तसेच त्यांना सांगलीची जागा सुद्धा सोडण्यात आली होती. या जागेच्या वादात स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला होता.
राहुल आवाडे यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे हे हातकणंगले मतदार संघात पसरलेले आहे. तसेच खासदार राजू शेट्टी आणि आवाडे हे एकाच समाजाचे असल्यामुळे त्याची मते सुद्धा विभागली जाऊ शकतात अशीही शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा फायदा तिसऱ्या उमेदवाराला होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रथम सांगलीच्या जागेचा वाद आता हातकणंगले मतदार संघातील वाद यामुळं शेट्टी यांच्या पुढे आपलीच जागा टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.राजू शेट्टी यांनी भाजपा युतीत असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे वाभाडे काढलेले होते त्याचाच राग कुठेतरी मनात ठेऊन राहुल हे शेट्टी यांना आव्हान देताना दिसत आहे.
लोकसभेसाठी राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. आघाडी अंतर्गत जिल्ह्यातील दोन्हीही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहेत. यापैकी हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. तेथून खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. तथापि, याच मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आवाडे यांचे पुत्र राहुल यांनी कालच अर्ज नेला होता. राहुल यांनी निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या घरात बंडखोरी होणार की हे बंड थंड केले जाणार, याची उत्सुकता कोल्हापूर जिल्यात लागलेली आहे.