Skip to content Skip to footer

काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला एकही जागा मिळवून देऊ नका -उद्धव ठाकरे

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा जाहीरनाम्यात करणाऱ्या काँग्रेसला आणि त्यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेची एकही जागा मिळू देऊ नका, अशी जबरदस्त घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खामगाव आणि हिंगोली येथे आयोजित जाहीर सभांमध्ये दिली. ‘बाळा राहुल, ही इटली नाही, हा हिंदुस्थान आहे. इथे आमचे देशप्रेम तुमच्या देशद्रोहाला भारी पडेल!’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या चिंधडय़ा उडवल्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बोलत होते.

दोन्ही सभांमध्ये गर्दीचा जल्लोष पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, आपली उन्हामुळे डोकी तापत आहेत. पण ती केवळ उन्हामुळेच तापून चालणार नाहीत, आपली डोकी आता विचारांनी तापली पाहिजेत. हिंदुत्वाच्या विचारांनी तापली पाहिजेत, मोदींनी एकदा नव्हे दोन वेळा पाकिस्तानात सैन्य घुसवून हल्ले केले. मोदींना मत का? त्याचे हेच उत्तर आहे. सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करू नका, अशी टीका विरोधक करताहेत, आमचेही सुरुवातीपासून हेच म्हणणे आहे, पण सैनिकांच्या शौर्याचे राजकारण होऊ नये, तसाच सैनिकांच्या शौर्याचा अपमानही होऊ नये, ही आमची भूमिका आहे. सैनिक कसे घुसले, कुठे घुसले, तिथे दहशतवाद्यांचा तळ होता का? किती मारले? असे प्रश्न विरोधकांनीही विचारू नये, पुरावे मागू नका म्हणजे राजकारणाचा विषयच येणार नाही.

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या मतदारांना देशद्रोहाचा कायदा रद्द झालेला चालणार आहे काय, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, मी टीका समजू शकतो; पण उद्या दाऊद आला आणि देशद्रोहाचा कायदा नाही, म्हणून घेणार आहात त्याला काँग्रेसमध्ये? देणार आहात त्याला लोकसभेची उमेदवारी? देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करणाऱया कन्हैयाकुमारसारख्या देशद्रोहय़ांना कडेवर घेणाऱया काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रात एकही जागा मिळू देऊ नका.

Leave a comment

0.0/5