संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना कॉंग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून झालेल्या विरोधानंतर गायकवाड यांचा पत्ता कट करण्यात आला. कॉंग्रेसने जेष्ठ निष्ठावंत नेते मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. गायकवाड यांच्या उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यास आम्ही तयार होतो, त्यांना उमेदवारी देण्यावरून श्रीमंत कोकाटे यांच्याशी देखील बोलणे झाले होते. गायकवाड यांना कॉंग्रेसकडून तिकीट मिळण्याची खात्री होती. शेवटी कॉंग्रेसने त्यांना धोका दिला, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. गायकवाड यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली असती तर आपण त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नसता, असा गौप्यस्फोट देखील आंबेडकर यांनी केला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून गायकवाड यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली दिसल्यावर, कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन दिले, मात्र शेवटी त्यांचे तिकीट कापले गेले. असं आंबेडकर म्हणाले. परंतु गायकवाड यांचा बळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील वादामुळेच झाला असेच बोलले जात आहे. पुणे मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राहुल गांधी यांना प्रवीण गायकवाड यांचे नाव सुचविले होते. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुद्धा राष्ट्रवादी ठरवणार का? असेच प्रश्न पुण्यातील काँग्रेस नेत्यांना पडलेला होता. त्याचमुळे राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा गायकवाड हे बळी पडले आहे असेच बोलले जाते.