लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार कालिदास कोळंबकर हे दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसवर नाराज असलेले काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री कालिदास कोळंबकर यांनी वडाळा येथील जनसंपर्क कार्यालयात राहुल शेवाळे यांचे स्वागत केले गेले.
नायगाव विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आपण शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा देत आहोत असे कोळंबकर यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार युतीचा प्रचार करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. कोळंबकर लवकरच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कट्टर राणे समर्थक समजले जाणारे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या शिवसेना पक्षाला दिलेल्या पठीब्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे.