सुशीलकुमार आणि विलासराव यांनी महाराष्ट्राची वाट लावली – नितीन गडकरी

नितीन गडकरी| Sushil Kumar-and-VilasraoSushil Kumar-and-Vilasrao

एक हसमुख आणि दुसरे देशमुख या दोघा नेत्यांनी मिळून महाराष्ट्राची वाट लावली, अशा शब्दांत भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा नाव न घेता टीका केली. स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांचा काँग्रेसचा इतिहास हा संपूर्ण बेइमानी आणि गद्दारीने भरलेला असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार आणि लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रचारार्थ गडकरी यांची इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

स्वातंत्र्योत्तर ७० वर्षांंचा काँग्रेसचा इतिहास हा संपूर्ण बेइमानी आणि गद्दारीने भरलेला आहे. राजकारण हा आम्हा भाजपवाल्यांचा धंदा नाही. राजकारणाला आम्ही राष्ट्रनिर्माणाचे प्रभावी उपकरण समजतो. त्याच भूमिकेतून आम्ही काम करतो. मी जे बोलतो, तेच करतो, असा दावा करताना गडकरी म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी तब्बल २७ हजार कोटी खर्चाची कामे करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. त्यातील ९० टक्के कामांचे भूमिपूजन केले आहे. आठ हजार कोटी खर्चाच्या पालखी मार्गाच्या कामाला लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

काँँग्रेस व राष्ट्रवादीवर घणाघात करताना गडकरी म्हणाले, की दलित, मुसलमान, आदिवासी, शेतकरी, शेतमजुरांच्या नावाने मते मागणाऱ्या दोन्ही काँग्रेसने देशातील गरिबी हटविली नाही. काँग्रेसने आपल्याच कार्यकर्त्यांची, नेते, चेले-चपाटय़ांची गरिबी तेवढी दूर केली. आता दोन्ही काँग्रेसची अवस्था ‘दिल के टुकडे हजार हुये, एक यहाँ गिरा, एक वहाँ गिरा’ अशी झाल्याचा टोमणा नितीन गडकरी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here