केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनी लुटणारे जामिनासाठी ‘ईडी’ आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहेत. त्यांना तुरुंगापर्यंत घेऊन आलोय, आता फक्त आत टाकणे बाकी आहे. जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास हा चौकीदार पुढील पाच वर्षांत नक्कीच तुरुंगात टाकेल, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट कढेरा यांना दिला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त हरयाणामधील फतेबाद येथे आयोजित सभेत बोलताना मोदी यांनी प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा व काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना शेतऱ्यांच्या जमिनीवर फक्त भ्रष्टाचाराची शेती करण्यात आली. करोडो रुपयांची शेतजमीन कवडीमोल दराने हडप करण्यात आली. याबाबतचे पुरावे जनतेसमोर असून यातून सुटका करून घेण्यासाठी धडपडणाऱ्यांना नक्कीच तुरुंगात टाकू, असे मोदी म्हणाले. दरम्यान, हरयाणातील माता वीर जवानांना जन्म देत आहेत. आम्हाला त्याचा अभिमान आहे, मात्र देशासाठी शहीद होणाऱ्या या वीर जवानांसाठी काँग्रेसने काही केले नाही, असेही मोदी म्हणाले.