पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे आपल्या प्रचार सभेत आरजेडी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली, परंतु दहशतवाद्यांसमोर नेहमीच गुडघे टेकले. पाकिस्तानला त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे जनतेनेही त्यांना कान पकडून आता बस झाले असे सांगितले, अशी टीका मोदी यांनी केली. यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलवरही तोफ डागली. बिहारला आम्ही अंधःकारातून एलईडीच्या युगात आणले, पण काँग्रेस आणि आरजेडी पुन्हा सत्तेत आले तर देशाला पुन्हा अंधःकारात ढकलतील, असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला.
काँग्रेसचा अहंकार सातव्या स्थानावर गेला आहे. त्यांचा हाच अहंकार आणीबाणी प्रसंगीही दिसला. जेव्हा संपूर्ण देशाला त्यांनी संकटात टाकले होते. त्यावेळी जयप्रकाश नारायणसारख्या महान व्यक्तीने त्यांची मस्ती उतरवली होती. या काँग्रेसने देशातून ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नावही मिटवण्याचा प्रयत्न केला होता. हा त्यांचा अहंकारच होता. बाबासाहेबांचे वारसदार असल्याचा दावा करणारे आज खुलेआम काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी विरोधकांवर केली. पुढे शेतकऱ्यांवर बोलताना मोदी म्हणाले की,विरोधकांनी शेतकऱयांच्या केवळ बाता केल्या. त्यांना खोटी आश्वासने दिली, पण त्यांच्या शेतात पाणी पोहोचले नाही. दुर्गावती जलयुक्त शिवार योजनेचे त्यांनी काय केले हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे काँग्रेसने शेतकऱयांची नेहमी फसवणूकच केली हेच उघड झाल्याच्या शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.