लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निडणुकीच्या रिंगणात न उतरता राज्यभर भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, पनवेल अशा अनेक ठिकाणी राज्यभर सभा घेऊन भाजपा पक्षाचे अक्षरशः वाभाडे काढले होते. या सर्व सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होणार का? हे येणाऱ्या २३ तारखेला दिसून येईल. त्यामुळे काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महाआघाडीत मनसे सामील होणार का? हे पाहावे लागेल. परंतु राष्ट्रवादी पक्ष मनसेला आघाडीत घेण्यासाठी लोकसभा निवडणुकी पासूनच उस्सुक दिसत होती.
अशातच राज ठाकरे यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे संजय निरुपम यांनी यावर सूचक भाष्य केले आहे. ‘राज ठाकरे यांना कुठल्याही परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत घेणार नाही, येऊ देणार नाही’, अशी ठाम भूमिका मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी जाहीर केली आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘मनसेचा आघाडीला फायदा होताना दिसला नाही. मनसेसाठी राष्ट्रवादी आग्रही असली, तरी काँग्रेसचा त्याला सक्त विरोध राहील. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही’ असं विधान केल आहे. दरम्यान, राज ठाकरेंना जर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत घेतलं नाही तर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहनं महत्वाचं ठरणार आहे.