निवडणुकीला पराभव दिसू लागल्यावर विरोधक एकतर निवडणूक प्रणालीवर आरोप करतात किंवा एकतर विरोधकांवर आरोप करतात. अशीच काहीशी परिस्थिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची झालेली दिसून येत आहे. सध्या राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका करत असताना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आयोगाच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगाने देशात अत्यंत योग्य पद्धतीने लोकसभा निवडणुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी केली. लोकशाही व्यवस्थेच्या यशामध्ये योग्य पद्धतीने निवडणुकीचे नियोजन करण्याचे महत्त्व जास्त असते, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुखर्जी यांनी केलेली निवडणूक आयोगाची स्तुती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हल्लीच्या वक्तव्यांशी जोडली जात आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आगपाखड केली आहे. आयोगावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती होती, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. किंबहुना निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रमच नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी आखण्यात आला होता, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी जे हवं तो बोलून जातात, इतर कोणी बोलले तर त्याला टोकले जाते. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेऊ शकतो त्यापेक्षा जास्त काही करु शकत नाही असंही यावेळी राहुल गांधींनी सांगितले.