राष्ट्रवाद, गरीबी, राष्ट्रीय सुरक्षा, शेतकरी प्रश्न अशा विविध विषयांवर गाजलेल्या निवडणुकी नंतर भाजपाला देशात महाकाय यश मिळवले आहे. ३५० जागांवर भाजपा दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. तर सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ५० च्या आतच थांबण्याची शक्यता वर्तवली जात होती. एकट्या भाजपने स्वबळावर ३०० चा आकडा पार केला. अब की बार, ३०० पार हा नारा खरा करत भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात २०१४ ला भाजपने पहिल्यांदाच पूर्ण बहुमत मिळवले होते. त्यावेळी मोदी लाट आली असे म्हटलं गेले. पण यावेळी भाजपने दावा केल्याप्रमाणे त्सुनामी आल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा एकदा एवढं मोठे बहुमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या निवडणुकीत अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पाटणा साहिबमधून शत्रुघन सिन्हा, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंग, शीला दीक्षित, मिलिंद देवरा, जया प्रदा, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती, केंद्रीय मंत्री हंसराज अहिरत, बेगुसरायमधून कन्हैय्या कुमार यांचाही पराभव झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. बंगालच्या ४२ जागांपैकी भाजपच्या खात्यात तब्बल १८ जागा आल्या आहेत. तर मध्य प्रदेशात २९ पैकी २८ जागा जिंकल्या आहेत.