पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली राहणार नाहीत. नव्या सरकारमध्ये मला मंत्री बनविण्याचा विचार करु नका, असे विनंती पत्र अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. अरुण जेटली यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या 18 महिन्यांपासून प्रकृती खराब आहे. यामुळे नव्या सरकारमध्ये देण्यात येणारी जबाबदारी सांभाळू शकणार नाही. त्यामुळे कोणत्याही मंत्रीपदाबाबत माझा विचार करु नये.
दरम्यान, अरुण जेटली प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी गेल्या तीन आठवड्यापासून प्रसिद्धीपासून दूर आहेत. कार्यालयात किंवा सार्वजनिक कार्यक्रमांनाही जात नाहीत. पक्ष प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणे पक्ष कार्यालयात जाणेही त्यांनी थांबविले आहे. भाजपा अध्यक्षांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालही ते उपस्थित नव्हते.
याचबरोबर, निवासस्थानी राहून ते तातडीच्या फायली निकाली काढण्यासाठी काही मोजक्या अधिकाऱ्यांना आवश्यकता असेल तर पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटतात. स्वत:वर कामाचे अधिक ओझे लादून न घेता प्रकृती सुधारण्याकडे लक्ष द्यावे, यासाठी त्यांच्या कुटंबातील सदस्यही आग्रही आहेत.
अरुण जेटलींची जागा कोण घेणार?
अरुण जेटलींची तब्येत फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारमधून निवृत्ती घेतली आहे. आता मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींकडे असलेला अर्थ मंत्रालयाचा कारभार कोणकडे सोपविला जाणार, याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची मोदींच्या नव्या मंत्रिमंडात वर्णी लागली तर त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.