Skip to content Skip to footer

शरद पवार काँग्रेस अध्यक्ष, तर राहुल गांधी विरोधी पक्ष नेते ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाही म्हणत असले तरी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही पक्षाच्या निकटवर्तीयांन कडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे. मात्र, विलीनीकरणानंतर राज्य नेतृत्वाबाबत काय करायचे, हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, विलीनीकरण होणार, हे जवळपास नक्की आहे. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागेल, हे आताच सांगणे शक्य नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी व शरद पवार यांच्या गुरुवारच्या भेटीत याबाबत चर्चा झाली नाही, कारण दोघांत हा विषय आधीच चर्चिला गेला आहे. या दोघा नेत्यांच्या विचारांत कमालीचे साधर्म्य असून, लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता, दोन्ही पक्षांना विलिनीकरणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडण्याबाबत अतिशय आग्रही असून, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर ते पद शरद पवार यांना मिळू शकेल, याची जोरात चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी अंतिम निर्णय घेईपर्यंत असे अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, असे काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदाबाबत किमान एक महिना लागेल, असे सांगून हा नेता म्हणाला की, पद सोडल्यानंतरही ते पद कोणाला द्यायचे, याचा निर्णयही राहुल गांधी स्वत:च घेतील. तोपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. असे सांगण्यात आलेले आहे.

Leave a comment

0.0/5