मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोन मध्ये (आजूबाजूचा परिसर) असलेल्या इमारतींचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. फनेल झोनमधील इमारतींच्या उंचीबाबत नव्याने अभ्यास करून नवी नियमावली तयार करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी नागरी हवाई उड्डाण मंत्री श्री. हरदीप सिंह पुरी यांना भेटुन केली आहे. या मागणीनुसार नव्याने नियमावली बनविली गेल्यास फनेल झोनमधील हजारो इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय’ विमानतळाच्या आजूबाजूचा सुमारे 15 किमीचा परिसर फनेल झोन म्हणून गणला जातो. विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगच्या दृष्टीने सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा आहेत. त्यामुळे या परिसरातील हजारो इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. याप्रकरणी स्वतंत्र अभ्यास करून नवी नियमावली तयार करावी, अशा आशयाचे निवेदन खासदार शेवाळे यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांना दिले.
वास्तविक, 3000 मीटरच्या पुढील इमारतींबाबत अभ्यास करून पुनर्विकासाचे धोरण ठरविल्यास अनेक वर्षांपासून रखडलेला हजारो इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागू शकेल. हा तिढा सोडविण्यासाठीच केंद्रीय मंत्री महोदयांना विनंती केली आहे. यावर लवकरच सकारात्मक कारवाई होईल, असे मत राहुल शेवाळे यांनी मांडलेले आहे.