Skip to content Skip to footer

स्टुडिओ १०८ या नव्या स्टुडिओचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते……

असंख्य कलावंत आणि तंत्रज्ञांचे वास्तव्य असलेल्या आणि चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाने गजबजलेल्या ठाण्यात चित्रीकरणाच्या प्रक्रियेसाठी नव्या अद्ययावत स्टुडिओचा शुभारंभ झाला आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विजू माने यांच्या स्टुडिओ १०८ या नव्या स्टुडिओचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यात मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे वास्तव्य देखील ठाण्यात आहे. मुंबईत आउटडोअर चित्रीकरणाला मोठ्या प्रमाणावर मर्यादा असताना ठाण्यात मात्र आउटडोअर चित्रीकरणाला चांगला वाव असून आर्थिकदृष्ट्या देखील ठाण्यात चित्रीकरण करणे किफायतशीर असल्यामुळे अनेक निर्माते ठाण्याला पसंती देत आहेत.

मात्र, तरीही चित्रीकरणोत्तर प्रक्रियेसाठी अद्यापही मुंबईत, विशेषतः अंधेरी परिसरातल्या स्टुडिओंकडे धाव घ्यावी लागते.
हे ओळखून ‘शर्यत’ आणि ‘खेळ मांडला’फेम प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विजू माने यांनी ठाण्यातच चित्रीकरणोत्तर प्रक्रियेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या स्टुडिओची उभारणी केली आहे. इनडोअर चित्रीकरण, संकलन, व्हीएफएक्स (स्पेशल इफेक्ट्स), अॅनिमेशन स्टुडिओ, कलर ग्रेडिंग, सब टायटल्स अशा चित्रीकरणोत्तर संपूर्ण सेवा या स्टुडिओत उपलब्ध असून चित्रीकरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री देखील पुरवण्यात येणार आहे. तसेच, डिजिटल मार्केटिंग, सिनेमाचे टीझर व ट्रेलर मेकिंग आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.

Leave a comment

0.0/5