महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. ते आजपासून ३ दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात ते पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आपली रणनीति ठरवतील. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यताही यावेळी तपासली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मनसेने “एकला चलो रे” ची भूमिका घेतलेली आहे.
राज ठाकरे राज्यभरातील जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. याची सुरुवात पुण्यापासून झाली आहे. त्यामुळे मनसे आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार की आघाडीसोबत हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्ष बांधणीसाठीच्या बैठकांमध्ये मनसेच्या राज्यभरातील ताकदीचाही अंदाज घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविराधातील झंझावाती प्रचार आणि तरीही भाजपला मिळालेले पूर्ण बहुमत याचाही विचार होईल, असे सांगितले जात आहे. त्याचा विचार करुनच भविष्यातील रणनीती ठरणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्वांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा केले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांवर गुप्त चर्चा होणार हे स्पष्ट होत आहे. यावर मसनेला आघाडीत सामील करण्यासाठी उस्सुक असलेली काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष विधानसभेला कोणती रणनीती ठरवेल हे येणाऱ्या दिवसात समोर येईल.