Skip to content Skip to footer

बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद, रणजितसिंह नाईकांची खेळी….

भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारे निरा डाव्या कालव्याचे नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. गिरीश महाजन यांनी याबाबत आदेश दिले असून येत्या दोन दिवसात लेखी आदेश निघणार आहेत. बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी आपल्या मतदारसंघात वळवण्याचे आश्वासन रणजितसिंह नाईकांनी दिले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ ला करार बदलत बारामतीला ६० टक्के पाणी दिले होते. २०१७ मध्येच हा करार संपला होता. मात्र तरीही बारामतीला जाणारं पाणी सुरूच होते. रणजितसिंह मोहिते पाटील आणि नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करुन अखेर बारामतीचे पाणी वळवण्यात यश मिळवले आहे.

पवार काका-पुतण्यांच्या निर्णयाला दोन्ही रणजितसिंहांनी शह दिला. निवडणुकीतही पाणी हा मुद्दा बनवण्यात आला होता. निवडून येताच रणजितसिंह नाईक कामाला लागले. अखेर बारामतीचे नियमबाह्य पाणी आता माढा मतदारसंघाला मिळणार आहे. नवनियक्त खासदार आणि मोहिते पाटील घराण्याचा पवारांना पहिला मोठा धक्का मानला जात आहे. बारामती आणि इंदापूरला निरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद केल्याने फार मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पाण्यासाठी संघर्ष होतोय की काय? पाण्यासाठी आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीतही पाण्याचा मुद्दाच गाजला होता. सांगलीतील काही भाग आणि माढा मतदारसंघातील काही तालुके नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतात.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, निरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना १०० टक्के होणार आहे.

Leave a comment

0.0/5