Skip to content Skip to footer

चांगला पाऊस पडून दुष्काळ दूर होऊ दे, उद्धव ठाकरे यांचे अंबाबाईला साकडे…….

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विजयी खासदारांना घेऊन कोल्हापूर अंबाबाईच्या दर्शनाला गेले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चांगला पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा अशी आई अंबाबाईला प्रार्थना करतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे.

राज्यात ४८ जागांपैकी ४१ जागांवर जागांवर शिवसेना भाजपने विजय मिळवला आहे, त्यामध्ये शिवसेनच्या १८ खासदारांचा समावेश आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे १८ नवनिर्वाचित खासदारांना घेऊन कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनला गेले आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी, मंत्रीपदाबाबत त्यांना विचारले असता, ही युती मंत्रीपदासाठी नाही तर केवळ हिंदुत्वासाठी केली आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून आम्ही नाराज नाहीत, मंत्रीपद पाहिजे असेल तर हक्काने मागू, लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाची मागणी आम्ही भाजपला केली आहे, असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, राज्यातील दुष्काळी परिस्थिती विषयी त्यांना विचारले असता, येत्या काही दिवसांमध्ये मी आणि आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळ दौऱ्यावर जाणार आहोत. असेही त्यांनी म्हंटले, तसेच, सरकारकडून दुष्काळ स्थितीत चांगले काम सुरु आहे, मात्र संपूर्ण त्यांच्यावर सोडून देणे हे बरोबर नाही, त्यामुळे आम्हीही प्रयत्न करत आहोत. आता केवळ चांगला पाऊस पडून राज्यातील दुष्काळ दूर व्हावा अशी आई अंबाबाईला प्रार्थना करतो असेही त्यांनी म्हंटले.

Leave a comment

0.0/5