मंत्री मंडळ विस्ताराबाबत आणि फेरफार करण्याबाबत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री मंडळातील विस्तारा संदर्भातील नेत्यांची नाव निश्चित करण्यात आली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी जागावाटपाचा काय फॉम्यूर्ला असावा या बाबतही चर्चा झाल्याचे समजते. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यासाठीच मी इथे आलो आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, फडणवीस मंत्रिमंडळाचा केवळ विस्तार होणार नसून फेरबदलदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. तसेच भाजपच्या वाटेवर असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांना या मंत्रिमंडळ विस्तारत मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.तसेच नवीन प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी याबाबत देखील फडणवीस यांनी शहांशी चर्चा केली. दरम्यान अमित शहा यांनी ९ जून रोजी महाराष्ट्रातील भाजपाची कोअर कमिटी आणि प्रमुख प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा आणि चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करणार आहेत.