लोकसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली, तेवढी झाडं लावण्याचा संकल्प धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बोलून दाखवला आहे. निंबाळकर पर्यावरणदिनी झाडे लावणार आहेत.
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, धाराशिव लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी विजय मिळवला. राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी झाडं लावण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे.
पर्यावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढ ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे पर्यावरणूपरक उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. मी धाराशिव या दुष्काळी भागातील जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. मला लोकसभा निवडणुकीत ५ लाख ९१ हजार ७०५ मतांचे आशीर्वाद जनतेनं दिले आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मी जितकी मते तितकी झाडे हा संकल्प राबवत आहे. त्यानुसार, मतदारसंघात ६ लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आहे.