Skip to content Skip to footer

काँग्रेस बैठकीत नवा सूर वंचित चालेल पण राष्ट्रवादी बरोबर आघाडी नको….

लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाचे खापर आता कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या माथी मारायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात पराभवाचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडताना कॉंग्रेसनेते दिसले. लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून काँग्रेस लढली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही. त्यांचा कल हा भाजपाकडे होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करावी, असा सूर काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत शुक्रवारी लावला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते या बैठकीला हजर होते. राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ आपल्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची मदत घेतली, परंतु काँग्रेसला त्यांच्या मतदारसंघात मदत केली नाही असा आरोप देखील करण्यात आल्याचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे. दरम्यान, नुकतीच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबत चिंतन बैठक महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसचे काम करत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत स्वबळावर लढण्याची मागणी केल्याची माहिती आहे.

Leave a comment

0.0/5