शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे कौतुक केले आहे. काही दिवसापूर्वी राहुल शेवाळे यांनी आपल्याला मिळालेल्या मतांच्या संख्येइतकेच झाडे लावण्याचा संकल्प येणाऱ्या पाच वर्षात करणार असल्याचे घोषित केले होते. आज मोठ्या प्रमाणात झाडाची कत्तल केली जात आहे. त्याचा पूर्ण परिणाम हा आपल्या पर्यावरणावर झालेला दिसून येत आहे. आज झाडे लावून प्रत्येकाने आपली पर्यावरणाविषयी असलेली जबाबदारी पार पडली पाहिजे असे मत खासदार राहुल शेवाळे यांनी बोलून दाखविले होते.
तसेच खासदार शेवाळे यांच्या अजून एका धाडसी निर्णयामुळे त्यांचे खुद्द आदित्य ठाकरे यांच्या कडून पुन्हा एकदा कौतुक करण्यात आलेले आहे. खासदार शेवाळे यांनी आपले खासदराकीचे पहिले वेतन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या लेखा विभागाला एक पत्र लिहून आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये जमा करावे, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.