Skip to content Skip to footer

अकरावी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख़्यमंत्र्यांना सुचविले उपाय.

अकरावी प्रवेशातील गोंधळ संपवण्यासाठी इंटर्नल मार्क्स ग्राह्य धरण्यात यावे आणि त्याच सोबत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी करण्यात यावी, असे दोन पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितल्याची माहिती, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अकरावी प्रवेशाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाविद्यालयांत जागा वाढवून देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे आज सांगितले. तसेच बाकी कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याचे सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीत दोघांमध्ये काय चर्चा झाली याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अकरावी प्रवेश आणि दुष्काळ परिस्थितीवर झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली. एसएससी बोर्डाचा यंदा कमी लागलेला निकाल आणि त्याचवेळी सीबीएसई-आयसीएसई बोर्डांमधील विद्यार्थांना मिळालेले मार्क यात मोठी तफावत आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न किचकट बनला आहे. विद्यार्थी चिंतेत आहेत. त्यांची चिंता दूर करण्यासाठी मी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढल्या वर्षासाठीचा संकल्प काय असे विचारले असता ‘आपल्या हातून चांगलं काम होत रहावं’ असे ते म्हणाले. राजकारणात उतरणार का या प्रश्नावर ते म्हणाले की दुष्काळ आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थांना अणि पालकांना चिंता करण्याचे काही कारण नहीं आहे असे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

Leave a comment

0.0/5