महाराष्ट्रात पाण्याच्या प्रश्नावरून तापत असलेल्या वातावरणावर सामनाच्या अग्रलेखातून सूचक विधान करण्यात आलेले आहे. राजकीय सभ्यता पाळण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून माढा, सांगोला वगैरे भागासाठी वळविलेल्या पाण्याला बारामती विरुद्ध माढा असा रंग मिळणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यायला हवी. निदान महाराष्ट्रात तरी पाण्याचे राजकारण घडू नये. निवडणुकांत पैशांचा पाऊस पडतो, पण निसर्ग कोपल्यामुळे तलाव, धरणे व जलशिवारांची डबकी होतात. तेव्हा जे पाणी निसर्गकृपेने मिळाले आहे ते सर्वांना न्याय्य पद्धतीने कसे मिळेल हे पाहायला हवे. पाण्याला कोणीच बाप नाही हे महत्त्वाचे,
सध्या पाण्याच्या वादावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर होत असलेल्या टीकेचा सुद्धा खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात राजकीय विरोधकांनी सौजन्य पाळले आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ते शिवसेनाप्रमुखांपर्यंत. त्यात मध्ये शरद पवारही येतात. अगदी एकेरीवर येऊन एकमेकांच्या विरोधात कुणी उभे ठाकले नाहीत. आणीबाणीच्या काळात यशवंतरावांचा ‘जोकर’ म्हणून केलेला उल्लेखही लोकांना आवडला नाही व यशवंतरावांना ‘जोकर’ म्हणणारे बॅ. अंतुले यांना त्याची किंमत चुकवावी लागली.
राजकारणात विरोध आणि किमान सभ्यता याचा समतोल राखला गेलाच पाहिजे. त्यातही पाणी हा लोकांचा जीवनमरणाचा प्रश्न असल्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. असे भाष्य करून पाण्या वरून चुकीच्या वळणावर चालत असलेल्या राजकारणी व्यक्तींना एक सूचक इशारा सुद्धा दिला आहे.