Skip to content Skip to footer

कॉंग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तारांना भाजपचा ‘चकवा’

औरंगाबाद – कॉंग्रेसला हात दाखवून भाजपचा कमळ हातात घेणाऱ्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळण्याची चर्चा होती. मात्र भाजपच्या स्थानिक पदाधिकारांच्या विरोधामुळे त्यांचे ‘स्वप्नभंग’ झाले आहे. त्यामुळे सत्तारांना मंत्रीपद तर सोडा भाजपमध्ये प्रवेशासाठी सुद्धा वेटिंग मध्ये राहण्याची वेळ आली आहे. भाजपने सत्तारांना ‘चकवा’ दिला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत सत्तार यांनी दिले होते. एवढच नाही तर लवकरच मला मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला होता. मात्र, सिल्लोड येथील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सत्तारांच्या प्रवेशाला विरोध केला होता. सत्तार यांना भाजपमध्ये घेतले तर, निवडणुकीत त्यांच्या विरोधात काम करण्याचा इशाराच भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी तूर्तास सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लावले आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज सत्तारांनी पक्षाचा राजीनामा दिला. याच काळात त्यांनी मुख्यमंत्री फडणीस आणि भाजपच्या नेत्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे भाजपमध्ये सत्तार यांचा प्रवेश करून मंत्रीपद दिले जाणार असल्याचे निश्चीत माणले जात होते. मात्र पक्षातील विरोध लक्षात घेता, भाजपने अब्दुल सत्तार यांना ‘चकवा’ दिला असल्याची पहायला मिळत आहे.

Leave a comment

0.0/5