Skip to content Skip to footer

कुठे आहेत राहुल गांधी?; लोकसभेत भाजपा खासदारांचा खोचक सवाल

नवी दिल्लीः 17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनासह कामकाजाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत नव्या सदस्यांना खासदारकीची शपथ दिली. परंतु या सभागृहात राहुल गांधी कुठेही दिसलेले नाहीत. शपथ घेतल्यानंतर खासदारांनी हंगामी अध्यक्षांना प्रश्न विचारला की, अखेर कुठे आहेत ते राहुल गांधी ?, सभागृहात राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर भाजपानं प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करत सांगितलं की, लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी सभागृहात दिसलेले नाहीत. भारतीय संविधानाच्या प्रति राहुल गांधींचा हाच सन्मान आहे काय?, असा प्रश्न मालवीय यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे राहुल गांधी केरळच्या वायनाडवरून थेट परराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार ते लंडनला गेल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाकडून यावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

संख्याबळाची चिंता करु नका; विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा – नरेंद्र मोदी
सभागृह चालविण्यासाठी विरोधकांनी कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं. संसदेच्या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांच्या अपेक्षा, स्वप्न घेऊन आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होत आहे. पहिल्यांदाच महिला खासदारांची संख्या या 17 व्या लोकसभेत सर्वात जास्त आहे. अनेक अडचणींवर मात करत बहुमतामध्ये पुन्हा एकदा जनतेने भाजपाला सत्तेत आणलं आहे. देशाची सेवा करण्याची आणखी एक संधी लोकांनी आम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच जनतेच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांना पाठिंबा द्यावा असं आवाहन मोदींनी सर्व पक्षांना केलं. तसेच येणाऱ्या 5 वर्षामध्ये सदनाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार कायम करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला दिला.

पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत राहुल गांधी
राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पर्यायी नेतृत्वाच्या शोधात आहे. त्यासाठी एका महिन्याची मुदतही देण्यात आली आहे. त्यामुळेच राहुल गांधी आजच्या बैठकीत सहभागी होणार नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ए. के. अँटोनी जबाबदारी सांभाळणार आहेत.

Leave a comment

0.0/5