लोकसभा निवडसणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला भाजपा-शिवसेना पक्षाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते हे भाजपा शिवसेना पक्षाच्या संपर्कात आले होते. काही दिवसापूर्वी बीडचे राष्ट्रवादीचे वजनदार नेते जयदत्त (अण्णा ) क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजपा सरकार मध्ये मंत्रिपद सुद्धा पटकावले होते. त्याच पावलावर पाऊल ठेऊन राष्ट्रवादीचे नाराज नेते रामराजे निंबाळकर यांनी सुद्धा राष्ट्रवादीला राम-राम ठोकत शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात बोलून दाखविल्या जात आहे.
साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. याबाबत ‘सरकारनामा’ने वृत्त दिलं आहे.