काल पार पडलेल्या शिवसेना वर्धापन दिन सोहळ्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवल्या उंचावल्या होत्या. या या सोहळ्यात संबोधताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणी कितीही आघाड्या करू द्या, वाघ आणि सिंह एकत्र आले की राज्य कोण करणार हे ठरलेले असते, असे सांगतानाच शिवसेनाप्रमुखांना स्वर्गातही अभिमान वाटेल असा प्रचंड विजय येत्या विधानसभेत मिळवूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या उपस्थितीबद्दल मीडियात सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेख केला.
ज्यांची प्रेरणा घेऊन आपण काम करतो ते हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पण करतो असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांनंतर शिवसेनेला ज्यांनी सक्षम, समर्थ नेतृत्व दिलं ते माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असा उल्लेख करताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजी, प्रमोदजी आणि आता उद्धवजींनी युती जोपासली आहे. हिंदुस्थानात सर्वांत जास्त काळ चाललेली ही युती आहे.
मध्यंतरी युतीत थोडा ताणतणाव नक्की होता; पण एका घरात एकत्र राहणार्या दोन सख्ख्या भावांमध्येही तो असतोच. ही युती अखंड राहावी अशी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मनात दृढ भावना होती. जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतात तेव्हा कोण राज्य करणार ठरलेले असते. लोकसभा निवडणुकीत देशात भाजपाला आणि महाराष्ट्रात महायुतीला मिळालेले यश हे अभूतपूर्व होते आणि या विजयाचे खरे शिल्पकार हे शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत, अशी कृतज्ञता मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली होती.