Skip to content Skip to footer

शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रमात माजी खासदारही दिसले सक्रिय

शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रमात माजी खासदारही दिसले सक्रिय

शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन काल संपन्न झाला. त्यानिमित्ताने षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरली. खुद्द फडणवीस यांनीही आपण इतिहासाचे साक्षिदार असल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात आणखी एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती म्हणजे शिवसेनेच्या माजी खासदारांचा सक्रिय सहभाग.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, यानंतर गीते, आनंदराव अडसूळ या दिग्गज खासदारांचा धक्कादायक पराभव झाला होता. शिवाय उदयनराजेंविरूद्ध निवडणूक लढवलेल्या नरेंद्र पाटलांनी जवळपास साडेचार लाख मतदान घेऊनही त्यांना विजय मिळाला नव्हता. शिवसेनेत सुद्धा या दिग्गजांचं पुनर्वसन करून त्यांचा मान राखावा अशी मागणी झाली होती. तसेच हे माजी खासदार आता शिवसेनेत सक्रिय राहणार किंवा नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती, मात्र हे खासदार शिवसेना संघटनेत सक्रिय दिसले.

लोकसभा निवडणुकित पराभूत झालेल्या दिग्गजांपैकी चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि अनंत गीते कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत दिसले, तर त्यामागील रांगेत शिवाजीराव आढळराव पाटील आणि नरेंद्र पाटील यांना स्थान दिलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सातारा मतदारसंघात उदयनराजेंना तंगडी फाईट देणाऱ्या नरेंद्र पाटील यांचा सत्कार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आनंदराव अडसूळांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एक लाख रुपये प्रदान करण्याची घोषणा केली तर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेत उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आल्याची घोषणा यावेळी केली गेली.

एवढंच नव्हे तर पक्ष पातळीवरील अन्य जबाबदाऱ्याही या माजी खासदारांना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे हे दिग्गज माजी खासदार शिवसेनेत सक्रिय असल्याचं म्हणता येईल.

Leave a comment

0.0/5