काँग्रेस पक्षाचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. काल विधानसभेच्या आवारात कालिदास कोळंबकर यांचा हात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या हातात होता. त्यामुळे अनेकांच्या भुवळ्या उंचावल्या होत्या. तसेच लोकसभा निवडणुकीला वडाळा विधानसभेचे आमदार असलेल्या कोळंबकरांनी लोकसभा निवडणुकीला शिवसेना लोकसभा उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराला आपल्या मतदार संघात फिरले होते तसेच जोरदार शिवसेना पक्षाचा प्रचार सुद्धा केला होते.
विशेष म्हणजे नारायण राणे यांचा पराभव करणारे आमदार वैभव नाईक हे सुद्धा त्यांच्या बाजूला उभे होते. त्यामुळे एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जाणारे कोळंबकर हे नारायण राणे यांचा साथ सोडून, राणे यांचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार का? हे येणाऱ्या दिवसात समोर येईल. काही दिवसापूर्वी कालिदास कोळंबकर हे भाजपात जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु हा मतदार संघ शिवसेना पक्षाकडे असल्यामुळे शिवसेना ही जागा भाजपाला सोडणार का? यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वडाळा मतदार संघात नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे.