- नागपुरातील बड्या काँग्रेस नेत्याचा मुलगा शिवसेनेत प्रवेश करणार?
विदर्भातील काँग्रेसचे नेते आणि १० वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. सतीश चतुर्वेदी हे विदर्भातील काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जातात.
२५ वर्षे आमदार आणि १० वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेल्या सतीश चतुर्वेदी यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तळागाळातील लोकांपर्यंत त्यांचा संपर्क आहे. शिवाय त्यांच्या अनेक शिक्षणसंस्था सुद्धा आहेत.
दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपल्या वडिलांकडून राजकीय धडे गिरवले आहेत. ते सध्या सामाजिक कार्यात सक्रिय असून शैक्षणिक संस्थांचा कारभार सुद्धा तेच सांभाळतात.
आता राजकारणात उतरताना त्यांनी शिवसेनेचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे शिवसेनेला विदर्भात आणखी बळ मिळणार आहे. नुकताच बीड येथील जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामुळे शिवसेनेची मराठवाड्यात ताकद वाढलेली असतानाच आता विदर्भात सुद्धा शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचं चित्र आहे.