लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीला पुन्हा उभारी आणण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज पर्यंत झालेल्या निवडणुकीत पवारांना कधी प्रचारासाठी इतके पळावे लागले नव्हते तितके २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पवारांना पायपीट करावी लागली होती. तरीही हव्या तेवढ्या जागेवर राष्ट्रवादीला यश मिळवता आले नाही. राष्ट्रवादीला महाराष्ट्रात फक्त चार जागेवर समाधान मानावे लागले होते.
यंदा पुन्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीची तीच परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून स्वतः पवारांनी येणाऱ्या निवडणुका आपल्या हातात घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकीला भाजपाने पवारांना त्यांच्याच मतदार संघात म्हणजे बारामती मतदार संघात अडकवून ठेवले होते. त्यासाठी भाजपाने रणनीती आखून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना बारामती मतदार संघात धाडले होते. त्यामुळे बारामती मतदार संघाची जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली होती.