Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री पदाच्या पुड्या सोडणाऱ्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा फटकारले.

 

मुख्यमंत्री पदाच्या पुड्या सोडणाऱ्यांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा फटकारले आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्यांना एवढे लक्षात ठेवावे. शेतकऱयांच्या मनातील आग आणि चीड प्रचंड आहे. ती शांत करा अन्यथा ते सत्तेचे आसन भस्म केल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे यांनी बजावले. कुणी काहीही म्हणो, मुख्यमंत्र्यांचे आणि आमचे ठरलंय! आमची युती घट्ट आहे याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. त्यामुळे अनेक दिवस चाललेल्या युती संदर्भातील उलट-सुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे.

उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या शेतकरी पीक विमा केंद्रांना भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी श्रीरामपूर येथील केंद्राला भेट दिली आणि नंतर शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, एक निवडणूक जिंकली की दुसरी जिंकणार… तिसरीही जिंकणार. ही खुळचट कल्पना करत बसणार्‍यांपैकी मी नाही. रोज वर्तमानपत्रांत आणि माध्यमातून बातम्या येत आहेत की, मुख्यमंत्री कोण होणार? मला त्याची पर्वा नाही. जोपर्यंत शेतकर्‍यांनी आणि माता-भगिनींनी दिलेल्या आशीर्वादाचे फळ म्हणून त्यांच्यासाठी दोन- चार सुखासमाधानाची कामे करू शकत नसेल तर राज्यकर्ता म्हणून जो कोणी असेल तो नालायक आहे हे मी स्पष्टपणे बोलतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई होत असून या घटनेचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्यावा, इतर आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी अनिता ठुबे व सुनीता कोतकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसैनिकांना शेतकर्‍यांसाठी मदतीचे आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून कुणी मावळे होत नाही. शिवरायांनी सांगितले होते शेतकर्‍याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. हीच शिकवण शिवसैनिकांना आहे. शेतकरी आणि गरीबांच्या मदतीला धावून जाणारा तोच खरा मावळा. त्यासाठी शेतकर्‍यांमागे ताकद उभी करा, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5