Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी ?

शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उपसभापती पदावरील दावा काँग्रेसने सोडला असून आज दुपारपर्यंत अन्य कोणाचाही अर्ज न आल्यास नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८ पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त आहे. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

आता त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे नावं विरोधीपक्षनेतेपदासाठी निश्चित केले आहे. तसे पत्रंही काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिल आहे. मात्र, उपसभापतीपदाचा दावा केल्यास विरोधीपक्षनेतेपद देणार नाही, असा पवित्रा युतीने घेतला. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली. काँग्रेसने नाइलाजाने उपसभापतीपदावरचा दावा सोडला आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. विधान परिषदेच्या उपसभापतींची आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा एकाच दिवशी करण्यात येणार आहे. आज ही निवडणूक होणार आहे. दुपारपर्यंत उपसभापतीपदासाठी अर्ज भरता येणार आहेत.

नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडत असतात. राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात. शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडं आहे. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही भूषवलं आहे.

Leave a comment

0.0/5