भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी भाजपा चिन्हावर निवडणूक लढण्याचे नाकारले आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला १० जागेची मागणी भाजपाकडे केलेली आहे. यावर आम्ही कमळाबरोबर लढू पण कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही. सध्या कमळाचे दिवस आले आहेत. पण माझा पक्ष माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढणे ठीक आहे पण मी तीन वेळा लोकसभा निवडणूक लढली. त्यावेळी कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे चिन्ह घेतले नाही. दुसऱ्या चिन्हावर निवडून येत नाही असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद लावली. युतीत मित्रपक्षांना १८ जागा सोडणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १० जागा सोडाव्यात.