Skip to content Skip to footer

राज्यात आंबेडकर-ओवेसी यांची युती, काँग्रेस पुन्हा वंचितच्या प्रतिक्षेत…….

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत नवीन चित्र पाहायला भेटणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याबाबत कोणताही ठोस प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे अद्याप आलेला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी एमआयएमला सोबत घेऊन लढेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आंबेडकर व ओवेसी यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका एकत्र लढल्या होत्या. या आघाडीला संभाजीनगरची एकमेव जागा जिंकता आली असली तरी वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेत निकालांचे गणित बदलून टाकले. सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास मतांचा आकडा तब्बल ४० लाखांच्या घरात गेला. याचा मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला. त्या रागातून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला लक्ष्य केले. ही आघाडी म्हणजे भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी केला. त्यामुळे आंबेडकर काँग्रेससोबत आघाडीसाठी हात पुढे करतील, ही शक्यता फारच कमी दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5