लोकसभेत भाजपा-शिवसेना पक्षाच्या अभूतपूर्व यशानंतर येणाऱ्या विधानसभेला भाजपा-शिवसेना पक्षात सम-समान जागावाटप आणि समान सत्तेची भागीदारी ठरलेली आहे. परंतु विरोधकांनसोबत भाजपाच्या काही अतिउस्साही कार्यकर्त्यांनी यावर उलट-सुलट भाष्य केले होते. त्यामुळं या बाबतची तक्रार खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठवून कल्पना दिली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. आता खुद्द महसूल मंत्री पाटील यांनी युतीच्या फॉर्मुला विषयी भाष्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेनं युती केली होती, त्यामुळे विधानसभेसाठी देखील युती होणार हे निश्चित आहे.
मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षातील नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. दरम्यान, आता भाजप शिवसेनेत जागावाटप आणि सत्तेत भागिदारीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला निश्चित झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. शिवसेना – भाजपची युती निश्चित आहे. विधानसभेच्या ५० टक्के जागा आणि सत्तेत ५० टक्के भागीदारी हा युतीच्या फॉर्म्युल्याचा मूळ गाभा आहे. जागावाटपाच्या चर्चेला बसल्यावर मतदारसंघाच्या अदलाबदलीबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.