राज्यात ८ हजार बोगस पॅथलॅब आहे. या लॅबद्वारे दररोज सुमारे एक लाख रुग्णाची फसवणूक केली जात आहे. तसेच त्यांचे आर्थिक शोषण सुद्धा केले जाते. मात्र या बेकायदेशीर पॅथलॅबची सरकारकडे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही. या लॅबमधून आरोग्य चाचण्यांचे चुकीचे अहवाल येत असल्याने लाखो रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या बेकायदा पॅथलॅबवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी मंगळवारी केली.
बेकायदा पॅथलॅब प्रकरणी कारवाई करण्याबाबत लक्षवेधी सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीवर आलेल्या लेखी उत्तरात दोषी वैद्यकीय व्यावसायिकांना शिक्षा देण्याचे अधिकार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर बोलताना सुनील प्रभू यांनी आक्षेप नोंदवर हे उत्तर बेकायदा लॅबना पाठीशी घालणारे असल्याचे सांगितले. पॅथलॅबमध्ये एम.डी. पॅथॉलॉजिस्ट तसेच डिप्लोमा इन पॅथोलॉजी असलेली व्यक्ती असणे बंधनकारक आहे.
अशाच व्यक्तीने वैद्यकीय आरोग्य चाचण्यांचे अहवाल स्वाक्षरी करून द्यावेत असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.
महापालिका आयुक्तांना आपल्या विभागात सर्वेक्षण करून या लॅबविषयीचा अहवाल देण्याचे आदेश देऊनही अहवाल सादर केला जात नसल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले.