Skip to content Skip to footer

“एसआरए” मार्फेत भाडेकरूंना भाडे देण्याचा कायदा करा- सुनील प्रभू

मुंबई सध्या एसआरए मार्फेत विकास होणाऱ्या अनेक झोपडपट्टीचा विकास मंद गतीने होत असताना दिसत आहे. विकासकाने तीन वर्षपेक्षा अधिक भाडे थकवल्याने भाडेकरूंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेकरूंना ‘एसआरए’मार्फत भाडे दिले जाईल असा कायदा करण्याची मागणी शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली. तसेच पुनर्विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागण्यासाठी विकासकांना कमी दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

विधानसभेत सुनील प्रभू यांनी नियम २९३ प्रस्तावावर चर्चेत भाग घेताना सरकारला पाच सूचना केल्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याची मागणी प्रभू यांनी केली. सध्या अनेक विकासकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. पुनर्वसनाच्या इमारती व विकण्यासाठी बांधण्यात येणार्‍या इमारती बांधण्यासाठी विकासकांकडे पैसे नाहीत. तीन वर्षांचे जागेचे भाडे विकासकाने थकवले आहे. त्यामुळे भाडेकरूंना ‘एसआरए’च्या माध्यमातून भाडे दिले जाईल असा कायदा करण्याची प्रभू यांनी मागणी केली.

पाच सूचना सुनील प्रभू यांच्याकडून मांडण्यात आल्या.
१) रेडी रेकनरचे दर तर्कसंगत करावे.
२) शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड (एसपीपीएल)च्या माध्यमातून सवलतीच्या दरात संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध करून द्यावीत.
३) सर्व शासकीय प्रीमियम सुरुवातीला 10 टक्के आकारावे. प्रकल्प पूर्णतेच्या वेळी उर्वरित शिल्लक रक्कम वसूल करावी.
४) क्षम विकासकाचे विक्रीसाठी असलेले बांधकाम क्षेत्र तारण ठेवून पुनर्वसन इमारतीच्या बांधकामासाठी कमी कर्जाने विकासकामासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे.
५) पुनर्वसन इमारतींवर जीएसटी कमी दराने आकारण्यात यावा.

Leave a comment

0.0/5