आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदार, जिल्हा प्रमुख तथा संपर्क प्रमुख यांना मार्गदर्शन केले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये या बैठकीचे शिवसेना पक्षातर्फे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुद्धा केली. आजवर शिवसेना कायमच जनतेच्या पाठिशी उभी राहिली आहे. सत्तेत असतानाही जनतेचे मुद्दे शिवसेनेने उचलून धरले. आपण कोणत्याही प्रकारच्या टीकेची पर्वा करत नाही. आपले मन प्रामाणिक आहे. जनतेला आपला हाच प्रामाणिकपणा भावला आहे. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून मतदान केल्याचे ते म्हणाले.
पुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आपण अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आहेत. तसेच त्यावर कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीत मी काय बोललो हे लोकांनी ऐकले आहे.