बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ याची प्रचिती गुरुवारी वारकरी बांधवांना पुणेकरांच्या अगत्यशीलतेतून आली. कीर्तन, हरिनामाचा गजर, माऊलींचे दर्शन अशा भक्तिमय वातावरणात पुणेकर गुरुवारी भक्तिरसात चिंब झाले. पावसाने वारकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
जगद्गुरू संत तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात विसावल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी तर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. दिवसभर विविध ठिकाणी रंगलेला कीर्तन सोहळा, ट्रकजवळ बसले अभंगांची बैठक, रस्त्यावर चाललेला राम कृष्ण हरि, माऊलींचा जयघोष कानावर पडला. गुरुवारी दुपारी झालेल्या पावसाने एकीकडे दिलासा दिला तर वारकऱ्यांची काहीशी तारांबळही उडाली.
पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान
ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत, टाळ-मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेली व भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरकडे निघालेले वारकरी दोन दिवस पुणेकरांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन शुक्रवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. परंपरेनुसार दोन्ही मंदिरांमधील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींच्या पादुकांवर विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकड आरती होऊन दोन्ही पालख्या सासवडकडे मार्गस्थ झाल्या . संत तुकाराममहाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने मार्गक्रमण करत लोणी काळभोर येथे विसावेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे मुक्काम करणार आहे. या मार्गावरील सर्वांत अवघड मानली जाणारी दिवेघाटाची चढण आहे. त्यासाठी वारकऱ्यांनी गुरुवारी विश्रांती घेतली.
पुण्यातील आदरातिथ्याने वारकरी सुखावले
पुण्यातील विविध शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये, मंदिरांमध्ये वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. समाजमंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची लगबग सुरु होती. पालख्या पुण्यात विसावल्यावर कायमच भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था होते. पुण्यातून निघाल्यावर राहुट्यांचा आसरा घ्यावा लागतो, असे वारकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.