लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांचे वजन काहीसे कमी झालेले दिसून येत आहे. चव्हाण यांना सुद्धा निवडणुकीला स्वतःचा गड राखता आलेला नाही. नांदेडमधून अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारून अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा पक्ष प्रमुखाकडे पाठवला होता. परंतु काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतः राजीनामा देत असल्यामुळे चव्हाणांच्या राजीनाम्यावर ते काय निर्णय घेणार अशी अडचण काँग्रेस मध्ये निर्माण झालेली दिसून येत होती.
त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेते पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह इतरही काही नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचं काँग्रेस पक्षाने जाहीर केलं आहे.