Skip to content Skip to footer

हिंदुत्वाचा भगवा जम्मू-कश्मीरमध्ये फडकवा- शिवसेनेची कठोर भूमिका

गेल्या सत्तर वर्षांत नेहरू आणि गांधींनी काय केले, याचा आता काथ्याकूट करू नका. जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० व कलम ३५ ए उखडून फेकून द्या. भगव्या जर्सीमुळे हिंदुस्थानचा पराभव झाला, अशी टिवटिव करणाऱया नेत्यांना जम्मू-कश्मीरमध्ये हिंदुत्वाचा भगवा फडकवूनच चोख प्रत्युत्तर द्या, अशी खणखणीत भूमिका शिवसेनेने सोमवारी राज्यसभेत मांडली.

जम्मू-कश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीला सहा महिन्यांची मुदतवाढ देणे आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगत राहणाऱया गावांतील नागरिकांना आरक्षण देणाऱया विधेयकावर सोमवारी राज्यसभेत साधकबाधक चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची खणखणीत भूमिका मांडली.

राष्ट्रवादाबाबत शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली आहे. देशाचा आवाज आता जम्मू-कश्मीरपर्यंत पोहचायला हवा. सत्तर वर्षांत नेहरू-पटेलांनी काय केले, विसरून जा आता आणि नवे काही तरी करा. जम्मू-कश्मीरमध्ये बेरोजगारी आहे त्यामुळे तिथले तरुण हातात दगड उचलतात आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देतात, हा युक्तिवाद मान्य नाही, असे स्ष्ट करत खासदार संजय राऊत यांनी बेरोजगारी सगळीकडेच बोकाळली आहे.

मग महाराष्ट्र, तमीळनाडू, आंध्रचा तरुण देशाविरोधात बंदूक उचलतो का, इतर राज्यांतला तरुण कधी ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देत नाही, असे सांगत मग जम्मू-कश्मीरमध्येच हे का घडतेय, असा सवाल उपस्थित केला. प्रत्येक राज्याला स्वतःची ओळख आहे. मात्र जम्मू-कश्मीरला स्वतःची अशी ओळख नाही. ‘एक प्रधानमंत्री, एक निशाण’ ही उक्ती आता मोदी-शाह जोडीने प्रत्यक्षात आणून दाखवावी, अशी अपेक्षा राऊत यांनी बोलून दाखविली.

Leave a comment

0.0/5